भाजपच्या उमेदवाराने खासदार निधीतून बांधले आलिशान घर आणि फार्म हाऊस; काँग्रेस नेत्याचा आरोप

BJP candidate | Lok Sabha Election 2024 : कोणत्याही खासदाराला प्रतीवर्षी दिला जाणारा निधी हा त्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणासाठी असतो. मात्र, मध्य प्रदेशातील धार मतदारसंघाच्या प्रतिनिधी भाजपाच्या सावित्री ठाकूर यांनी खासदार निधीचा वापर करुन स्वत:चे दोन मजली आलिशान घर आणि एक फार्म हाऊस बांधले. शिवाय ही बाब प्रतिज्ञापत्रात लपवल्याचेही उघड झाले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मुवेल यांनी याबाबत जिल्हाधिकारी प्रियांक मिश्रा यांच्याकडे तक्रार केली आहे.

हे प्रकरण भाजपच्या धार लोकसभा उमेदवार सावित्री ठाकूर यांच्याशी संबंधित आहे. सावित्री ठाकूर यांनी खासदार असताना सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप या जागेवरील काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मुवेल यांनी केला आहे. त्यांनी खासदार निधीतून शेतजमिनीवर दुमजली घर बांधले. स्वत:च्या निधीतून लाखो रुपये खर्च केले. त्यांनी शपथपत्रात या इमारतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मुवेल यांनी आपल्या आक्षेपात भाजप उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात अनेक स्तंभांची माहिती दिली नसून वस्तुस्थिती लपवल्याचे नमूद केले आहे. माजी खासदार ठाकूर यांनी बागवानिया गावातील शेतजमिनीत फार्म हाऊस बांधल्याचे मुवेल यांनी सांगितले, ज्याचा त्या स्वतः वापर करत आहेत.

गृहनिर्माण आणि व्यावसायिक इमारतींच्या रकान्यात ही वस्तुस्थिती नमूद न केल्याने सर्वसामान्य मतदारांपासून इमारत बांधकाम लपवण्यात आले आहे. १७ ऑगस्ट २०१६ रोजी खासदार निधीतून सामुदायिक इमारतीच्या बांधकामासाठी १४ लाख ८९ हजार रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीचा आदेश दिल्याचा आरोप काँग्रेस उमेदवाराने तक्रारीत केला आहे.

माहिती लपविण्याबाबत मुवेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पहिली तक्रार केली आहे. आता ते न्यायालयात जाणार असल्याचे मुवेल यांनी सांगितले. प्रतिज्ञापत्रातील रकाने कोरे ठेवून माहिती लपविल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने यापूर्वी नामनिर्देशन अर्ज नाकारले आहेत. यापूर्वीही सुरेश भंडारी आणि नीना वर्मा यांच्या प्रकरणात न्यायालयाने असे निर्णय दिले आहेत.