भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी लवकरच

सातारा – भाजपची जिल्हा कार्यकारिणी, मंडलाध्यक्ष, युवा मोर्चा व आघाड्यांच्या पदाधिकारी निवडी लवकरच जाहीर केल्या जातील. पक्षाच्या कामासाठी जबाबदारी घेऊन वेळ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे या निवडीमध्ये निश्‍चित होणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकारांना दिली.

पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे, प्रदेश चिटणीस भरत पाटील, जिल्हा प्रभारी माजी खासदार अमर साबळे, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, लोकसभा संयोजक सुनील काटकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी प्रियाताई शिंदे, प्रदेश कार्यकारी सदस्य सुवर्णा पाटील, वाई विधानसभा निवडणूक प्रमुख सुरभि भोसले, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, कराड दक्षिण निवडणूक प्रमुख धनंजय पाटील, फलटण विधानसभा प्रमुख जयकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांत “मेरी माटी, मेरा देश’चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा आढावा या बैठकीत घेण्यात आल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरावड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या वेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील मंडल अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती अमर साबळे यांनी घेतल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा, सर्व मंडलामध्ये मी प्रवास केला असून पदाधिकाऱ्यांची चाचपणी केली आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले. जिल्हा कार्यकारिणी आणि मंडल अध्यक्ष तसेच आघाड्या, मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.

त्यानंतर मंडल कार्यकारिणी, आघाड्या, मोर्चे यांची जिल्हा, मंडल कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. पदाधिकारी निवडीमध्ये पक्षाची कामे प्रामाणिकपणे करणारे, पक्षाच्या कामाला वेळ देणारे कार्यकर्ते घेतले जातील. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा समतोल पदाधिकारी निवडीमध्ये राखण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, युवती, युवक यांच्याबाबतीत योग्य समन्वय साधणारे पदाधिकारी घेण्याबाबत विशेष काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.