शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका; हरियाणातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराभूत

चंदीगड – हरियाणात महापालिका व नगरपालिका निवडणुकीत सत्तारूढ भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पार्टी या पक्षांना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा दणका बसला आहे. सोनिपत आणि अंबाला येथील महापौरांच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. जननायक जनता पार्टीला हिस्सार जिल्ह्यातील उकलाना आणि रेवारीच्या धरूहेरा येथील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.

सोनिपत या महत्वाच्या शहरातील महापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा 14 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. अंबाल्यात हरियाना जनचेतना पार्टीच्या शक्तीरानी शर्मा यांनी भाजपचा पराभव करून विजय मिळवला आहे. भाजपचा उमेदवार पंचकुलात आघाडीवर आहे पण जननायक जनता पक्षाला मात्र दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.

उकलाना आणि धरूहेरा या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. हा शेतकरी आंदोलनाचा फटका मानला जात आहे. हरियानातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या तीन नवीन कायद्यांबद्दल कमालीचा असंतोष व्यक्त केला आहे. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडवून त्यांच्यावर हरियाना सरकारने लाठी हल्ला केला होता, तसेच त्यांच्यावर गार पाण्याचे फवारेही मारले होते. त्यामुळे मुख्यमंत्री खट्टर यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

Leave a Comment