माथाडी कायदा उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव

वाई –  मी लोकांसाठी काम करणारा व वेळ देणारा कार्यकर्ता आहे. कै. यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांचा, आपल्या हक्काचा माणूस म्हणून २५ वर्षे आमदारही राहिलो आहे. माथाडींचा कायदा उद्ध्वस्त करण्याचा डाव भाजप सरकार करत आहे. याबाबत दिल्लीमध्ये मी आवाज उठवणार असल्याची ग्वाही सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

वाईच्या पश्चिम भागातील गावांमध्ये दऱ्याखोऱ्यातील जनतेशी आ. शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती भैय्या डोंगरे, राजेंद्र शेलार, डॉ. नितीन सावंत, विराज शिंदे, जयदीप शिंदे, संतोष कोंढाळकर, संतोष कळंबे, अण्णा पाटील, विजय पिसाळ, संतोष ननावरे उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे माथाडींच्या जीवनात वैभव निर्माण झाले. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. मला माथाडींची साथ नेहमीच लाभली. या निवडणुकीत माझ्या रुपाने माथाडींचा आवाज दिल्लीत पोहोचणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आ. शिंदे पुढे म्हणाले, जांभळी खोऱ्यातील पर्यटन, रोजगाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मिळालेले पद आपल्या माणसांच्या संरक्षण व संवर्धनासाठी वापरायचे असून माथाडी कामगारांचा मुलगा या सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत आहे.

जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला आ. शशिकांत शिंदे यांनी पाठिंबा देऊन मराठ्यांची मने जिंकली आहेत, असे राजेंद्र शेलार यांनी सांगितले. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माथाडींचा नेता आपल्याला खासदार म्हणून लाभणारा असून पश्चिम भागातील सुमारे ८० टक्के माथाडी कामगार त्यांच्यासोबत राहतील, असा विश्‍वास संतोष कोंढाळकर यांनी व्यक्त केला.

भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली – आ. शिंदे
वाई येथील महागणपतीचे दर्शन घेऊन आ. शशिकांत शिंदे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी वाईच्या पश्चिम भागाचा दौरा केला. ठिकठिकाणी मतदारांशी गाठीभेटी घेतल्या. भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे महायुतीला हद्दपार करण्याचे जनतेने ठरवले आहे, असे आ. शिंदे यांनी सांगितले. या दौऱ्यात दिलीप बाबर, डाॅ. नितीन सावंत, प्रसाद सुर्वे, डाॅ. सतीश बाबर, केदार गायकवाड, विराज शिंदे, जयदीप शिंदे, प्रताप यादव, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, माथाडी कामगार, युवक, महिलासह ग्रामस्थ सहभागी झाले.