रक्‍तपेढीत रक्‍ताचा तुटवडा

करोनाची धास्ती घेतल्याने रक्‍तदात्यांची पाठ

पिंपरी – दरवर्षी उन्हाळ्यात रक्‍ताचा तुटवडा निर्माण होतो. परंतु मोठ्या पातळीवर रक्‍तदान शिबिरे आयोजित करुन रक्‍ताची उणीव भरुन काढली जाते. परंतु सध्या “करोना’मुळे सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत.

तसेच उपनगरांमध्ये दरवर्षी होणाऱ्या गावजत्रा देखील रद्द झाल्या असल्याने रक्‍तदान शिबिरे ठप्प झाली आहेत. याचा मोठा परिणाम रक्‍ताच्या उपलब्धतेवर दिसून येत आहे. त्यासोबतच करोनाची धास्ती घेतल्याने रक्‍तदात्यांनी रक्‍तदानाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे शहरात रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

रक्‍तदानाविषयी जनजागृती करण्यास रक्‍तपेढ्यांना यश आल्याने गेल्या काही वर्षांमध्ये रक्‍ताचा मोठा तुटवडा जाणवत नव्हता. मात्र दरवर्षी उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत रक्‍ताची चणचण भासते. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्‍तपेढीतील अधिकाऱ्यांनी नियोजन केल्यामुळे हक्‍काचा रक्‍तदाता आणि संस्थाचा वापर या दिवसामध्ये केला जातो. यामुळे गेल्या तीन वर्षापासून उन्हाळा आणि दिवाळीत रक्‍ताची अत्याधिक कमतरता भासली नव्हती.

मागणी अधिक, पुरवठा कमी
वायसीएम रुग्णालयात होणाऱ्या विविध तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी दररोज किमान 35 रूग्णांना रक्‍ताची आवश्‍यकता भासते. ही गरज विविध शिबिरातून तसेच रक्‍तदात्यांनी केलेल्या रक्‍तदानातून पूर्ण केली जाते. मात्र करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भयावह वातावरणामुळे मागील आठ दिवसात रक्‍त संकलनाचे काम अत्यंत अल्प झाले आहे. दररोज फक्‍त 20 ते 25 शस्त्रक्रियांना रक्‍त देता येते. रक्‍तदात्यांनी केलेल्या रक्‍तदानामुळे रुग्णांना जीवनदान मिळते. येथे उपचाराला येणाऱ्या अनेक थेलेसेमियाच्या रुग्णांनाही मोठ्या संख्येने रक्ताची गरज भासते. या रुग्णांसाठी रक्तपेढीत नित्याने रक्ताचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. कारण रक्‍तास अद्याप कोणताही पर्याय उपलब्ध झालेला नाही.

खबरदारीचे उपाय
रक्‍त संकलित करताना काही खबरदारीचे उपाय सुचविण्यात आले आहेत. रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतची लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून घ्यावा, रक्‍तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून शिबिर घ्यावे, रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती व संभ्रम दूर करावा, असे आवाहन केले आहे.

रक्तदान हे गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. रक्तदान, रक्त संक्रमणाने करोना विषाणूची लागण होत नाही. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सर्व सामाजिक, धार्मिक संस्थांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिर घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील. गर्दी टाळण्याचे प्रयत्न करून कुणालाही विषाणूजन्य आजाराची लागण होऊ नये म्हणून काळजी घेता येते. गेल्या काही दिवसांतील प्रवासाची माहिती रक्तदात्याला द्यावी लागेल. ज्या रुग्णांना सर्दीचा त्रास होत आहे, ताप आलेला असल्यास त्यांना रक्तदान करू दिले जाणार नाही. रक्तपेढी या गर्दीपासून दूर असतात. एक प्रकारे हा विलगीकरण कक्ष असतो. यामुळे रक्तदान करता येते. यामुळे रक्‍तदात्यांनी निर्भीडपणे पुढे यावे.
– डॉ. मोसलगी, वायसीएम रुग्णालय रक्‍तपेढी

Leave a Comment