“योगी आदित्यनाथांचे शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस”; मुख्यमंत्र्यांना फेसबुकवरून पुन्हा जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वारंवारपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यन, आज पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली असून या पोस्टमध्ये, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ज्या फेसबुक प्रोफाईलवरून सीएम योगी यांना धमकावण्यात आले आहे, त्यांचे नाव आत्मा प्रकाश असून यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. याच पानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय शिरच्छेद करणाऱ्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले आहे.

मुरादाबाद शहराचे पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, ज्या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली आहे, त्याच्या प्रोफाइल पिक्चरवर पाकिस्तानचा झेंडा आहे. या संदर्भात फेसबुकला ईमेल पाठवून या पेजबाबत माहिती मागवण्यात आली आहे.