पुस्तक परीक्षण – सांज

माधुरी तळवलकर

मोजकेच पण दर्जेदार लिखाण करणाऱ्यांमध्ये सखा कलाल यांचे नाव घ्यावे लागेल. “सांज’ या पुस्तकातील कथांमधे खेड्यातील व्यक्‍तींच्या दैनंदिन जीवनातले सुखदुःखांचे हळवे आणि तीव्र स्वर त्यांनी कोरले आहेत.

“सांज’ या पहिल्याच कथेमध्ये खेड्यातील संध्याकाळ रंगवली आहे. दिवस उतरणीला लागलाय. आभाळाचे रंग बदलत ते हळूहळू काळवंडतं आणि अशा कातर वेळी घरातल्या बाईचं मन व्याकुळ होतं. बाहेरून सासरा घरात येतो. सासू, पोरांचे हट्ट… पण या साऱ्यात तिचा नवरा नाही. तो अजून घरी आलेला नाही. तिला एकटं वाटू लागतं, डोळ्यात पाणी भरू लागतं… उगाचच! ही वेळच अशी! वाढती सांजवेळ!

या कथेला कथानक म्हटलं तर एवढंच! या पुस्तकातील साऱ्याच कथांना कथानक फार नाही पण ती वेळ, तो प्रसंग, त्यातून व्यक्‍त होणाऱ्या उत्कट भावना… याच रंगवण्यात लेखकही रंगून जातो आणि आपणही त्यात रमतो. अनेकदा असे होते की, जिच्या घरी लग्नकार्य असेल, ती ते मंगलकार्य निर्विघ्नपणे, चांगल्या तऱ्हेने पार पडावे म्हणून झटत असते. आणि नातेवाईक, जातवाले मात्र कधीकधी, हीच वेळ आहे या माणसाला अडवून धरण्याची, असं समजून मानापानाच्या गोष्टी बोलत राहतात. “पंगत’ कथेमध्ये लग्नघरातील मुख्य माणसांची होणारी उलघाल लेखकाने अचूक टिपली आहे.
ऐन तारुण्यात बायकोला छळणाऱ्या अनेक नवऱ्यांना म्हातारपणी उपरती होते. “धनी’ नावाच्या कथेत नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तरुण सारजा मुलाला घेऊन माहेरी येते. आता तिला म्हातारपण आलेलं. आणि अचानक एकदा संध्याकाळच्या वेळी नवरा घरात येतो. का येतो? कोण जाणे. पावलं चालत येतात खरी…! दोघांनाही बोलायचं खूप असतं पण आता उशीर झालाय. उमेदीचं आयुष्य, तारुण्यातल्या आशाआकांक्षा संपून गेल्या आहेत. त्या दोघांमध्ये संवाद काहीच होत नाहीत. तो काही वेळ बसून मुकाट्यानं तिथून बाहेर पडतो. सखा कलाल यांच्या या पुस्तकातील बहुतेक कथा चटका लावून जातात.

रात्री उशिरा घरी येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहणाऱ्या बायकोची धास्ती, तळमळ व्यक्‍त करणारी “रात्र’ नावाची कथाही अशीच भावनांची सरमिसळ व्यक्‍त करते. वयात आलेली मुलगी अंधार पडायला लागला तरी अजून घरी परतली नाही म्हटल्यावर आईवडिलांची काय तळमळ होत असते ते “नीती’ या कथेत लेखकाने रंगवले आहे. कथेचा शेवटही अर्थपूर्ण आहे.

घरातला कर्ता मुलगा सुनेला मागे ठेवून देवाघरी गेल्यावर त्याच्या आईवडिलांची किती तडफड होते हे, “दुःख’ या कथेत व्यक्‍त होते. सासू, सासरा आणि सून आपलं दुःख लपवून दुसऱ्याला धीर देताना आपण वाचतो तेव्हा मन उदास होतं. जे काही सांगायचं आहे, ते अगदी कमी शब्दात मांडण्याचं कौशल्य लेखकाकडे आहे. या पुस्तकातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथेतील घरात सासू आहे, सासरा आहे, एखाददुसरं लहान मूल, आईवडील आहेत, इतकंच नव्हे तर एखादं कुत्रं, मांजर, कोंबड्या, शेळी… असं सारं शेतकऱ्याचं अस्सल कुटुंब आहे. सांज पुस्तकातील, मानवी भावनांचा रसपरिपोष असलेल्या कथा वाचकाला भावसमृद्ध करतात.

Leave a Comment