सहारा वाळवंटात सापडला बुमरॅंग उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून परत पृथ्वीवर परतला

राबात – बुमरॅंग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते. या संकल्पनेला बुमरॅंग असे म्हटले जाते. हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरॅंग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता आणि हजारो वर्षे अंतराळात राहून तर पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मोरोक्को देशातील सहारा वाळवंटात हा लालसर रंगाचा उल्कापिंड सापडला आहे. शास्त्रज्ञांनी या उल्कापिंडाची तपासणी केली असता त्यामध्ये पृथ्वीवरील सर्व गुणधर्म आढळले. साहजिकच हा उल्कापिंड पृथ्वीवरचा असावा या विधानाला बळकटी मिळाली. काही वर्षापूर्वी हा उल्कापिंड सहारा वाळवंटात सापडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या इंटरनॅशनल जिओ केमिस्ट्री कॉन्फरन्समध्ये या उल्कापिंडाबाबत माहिती सादर करण्यात आली.

या उल्कापिंडाचे वजन 658 ग्रॅम असून त्याला एनडब्ल्यूए 13188 असे नाव देण्यात आले आहे. उल्कापिंडाची भूवैज्ञानिक तपासणी केली असता हा उल्कापिंड दहा हजार वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये अंतराळात असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, पण मुळात पृथ्वीवरील हा उल्कापिंड अंतराळात गेला कसा याबाबतही काही मते मांडण्यात येत आहेत.

एका मतानुसार ज्वालामुखीच्या अत्यंत शक्तिशाली स्फोटानंतर हा तुकडा अंतराळात फेकला गेला असावा. दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे एका मोठ्या उल्कापिंडाने जोरदार धडक दिल्यामुळे हा तुकडा अंतराळात फेकला गेला असावा. सध्या हा उल्का पिंड मोरोक्कोमधील प्रयोगशाळेत ठेवण्यात आला आहे. त्यावर अधिक संशोधन करण्यात येत आहे.