थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं

नागठाणे – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या गेल्या. तेव्हा महाराष्ट्रातील थोर नेते कृषीमंत्री होते. असे असताना आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही, असा सवाल सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आधी अडचणीत आणायचं आणि उपकार करण्याचा आव आणण्याची त्यांची जुनी पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.

उदयनराजे यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यात वर्णे व नागठाणे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उदयनराजे बोलत होते. आपल्यासोबत असणाऱ्यांचं ते नुकसानच करतात. कै. अभयसिंहराजे भोसले, विलासकाका पाटील उंडाळकर ही कर्तबगार मंडळी होती. पण त्यांच्या योगदानाची कदर केली गेली नाही. युज अँड थ्रो अशी संबंधित नेत्यांची जुनीच रीत आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भाजप बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते. परंतु, आम्ही सर्व नेते बहुजन समाजातील शेतकरीच आहोत. साखर कारखानदारीचे कंबरडे मोडणारा आयकराचा मुद्दा शहा यांनी रद्द केला. अन्यथा साखर कारखानदारीला टाळे लावण्याची वेळ आली असती. पर्यायाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले असते. त्यामुळे भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा.

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, ही लोकसभा निवडणूक भविष्यातील विकसित भारताचा पाया रचणारी आहे. त्यामुळे उदयनराजेंना जाणारे मत हे मोदींना जाणार आहे. उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे ही जबाबदारी आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज घोरपडे म्हणाले, सगळ्यांचे सोनं होण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहा. वर्णे व नागठाणे गटातून उदयनराजेंना मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही मनोज घोरपडे यांनी दिली. संतोषभाऊ कणसे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

भाऊसाहेब महाराजांची उपेक्षा का केली?
अभयसिंह राजे उर्फ भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले असते. परंतु, नेत्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्य सरकार स्थापन झाले. परंतु, भाऊसाहेब महाराजांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं गेलं, याचे उत्तर नेत्यांनी द्यावं, अभयसिंहराजे भोसले यांच्यासारख्या नेत्यांची उपेक्षा केली तेच नेते अभयसिंह महाराजांचे छायाचित्र प्रचारासाठी लावतात, अशी टीका त्यांनी केली.