Tokyo Olympics : लोवलिनाने केले पदक निश्‍चित

टोकियो – भारताची नवोदित महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक निश्‍चित केले आहे. 

कारकिर्दीतील प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची कामगिरी केलेल्या लोवलिनाने महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर मात केली व उपांत्य फेरी गाठली. 

लोवलिनाने निन-चीनवर 4-1 अशी मात करत पदक निश्‍चित केले आहे. मुष्टियुद्धात उपांत्य फेरी गाठली की पदकाची निश्‍चिती होते. तिची आता उपांत्य फेरीत माजी विश्‍वविजेत्या तुर्कीच्या ऍना लिसेन्कोशी लढत होईल. 

जर तिने पदक पटकावले तर ती मुष्टियुद्धात अशी कामगिरी करणारी भारताची दुसरी महिला मुष्टियोद्धा बनेल. यापूर्वी सुपर मॉम मेरी कोमने 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक मिळवले होते.