मेंदू तल्लख बनवते ब्राह्मी वनस्पती; जाणून घ्या इतरही औषधी गुणधर्म

ब्राह्मी हे नाव बह्मापासून व देवी सरस्वती यांपासून निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष ब्रह्माण्डाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मांपासून त्याची उत्पत्ती समजली जाते. ब्रह्मा जसे बुध्दी व स्मृती यांचे प्रतिक आहे तसेच ही वनस्पती स्मरणशक्‍ती व मेंदुची बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यास उत्तम प्रकारे काम करते. मेंदू व मज्जासंस्थेवर नियंत्रण करणारी व त्यांचे कार्य उत्तम प्रकारे करणारी वनस्पती म्हणून ब्राह्मीला विशेष महत्व आहे.

ब्राह्मी दलदलीच्या ठिकाणी उगवते. संपूर्ण वनस्पतीचा उपयोग औषध निर्माणासाठी केला जातो. ही एक कडु चवची, तुरट व शीत गुण असणारी वनस्पती आहे. शीत गुणांमुळे मेंदुला शांत ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मेंदूस पोषण मिळते. केस व त्वचा रोगांवर व सौंदर्य वाढविण्याकरिता ब्राह्मी उत्तम असते. त्वचेला तजेलदार ठेवण्यात व सुरकुत्या कमी करण्यासाठी ब्राह्मी वापरली जाते.

ब्राह्मी चवीला कडु, तुरट असते. तसेच शीत गुण युक्‍त व हलकी असते. ब्राह्मी तीनही दोषांवर म्हणजे वात, पित्त व कफ या दोषांवर शामक म्हणुन काम करते. ब्राह्मी ही वातावर चांगल्याप्रकारे काम करते.

आमवातावर, कडू व तुरट गुणांमुळे आमाचे पचन करण्याचे काम करते, पित्ताचे शमन करते व सांध्यामधील लवचिकता वाढवते. सांध्यांची बळकटी वाढविण्यासाठी ब्राह्मी उपयोगी असते.

पित्तविकारात ब्राह्मी, आवळा व निंम्ब या बरोबर पोटातून घेतली जाते.
ब्राह्मीलामध्ये रसायन म्हंटले आहे. यामध्ये नसांवर व मज्जासंस्थेवर शक्‍तीवर्धक म्हणून कार्य करणारी व पुनर्जीवित करणारी काही तत्व असतात. ब्राह्मी ही मनावरील ताणतणाव कमी करणारी आहे. ब्राह्मीधृत हे मानसिक रोगांवर अत्यंत लाभकारी आहे. मेंदू व मज्जासंस्थेचे कार्य चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. उन्मादसारख्या आजारांत ब्राह्मी धृत, ब्राह्मी रसायन उपयोगी असते. मेंदूतील कार्यप्रणाली सुधारते व रसायनांचे स्त्रावांचे उत्सर्जन नीट होणे यासाठी ब्राह्मी काम करते.

स्मरणशक्‍ती वाढवणे, एकाग्रता व मेंदूला चालना देणारी क्षमता ब्राह्मीमध्ये आहे. बुध्दी व मेधा वाढविणारी म्हणून ब्राह्मी ओळखली जाते. वयस्क लोकांमध्ये स्मृतीभ्रंश किंवा स्मृतीनाश या सारख्या लक्षणांमध्ये ब्राह्मीमधील औषधीतत्वे उपयोगी पडतात. अँटीऑक्‍सिडंट गुण असणारी ब्राह्मी मेंदुतील पेशींची झीज रोखण्यास उपयोगी असते. स्मरणशक्‍ती चांगली करण्यात व मेंदूतील झीज कमी करण्यास मदत करते.

श्‍वसन संस्थेच्या स्वास्थ्यासाठी ब्राह्मी चूर्ण स्वरूपात उपयोगी असतो. जीर्ण खोकला, ब्रोंकायटीस, ऍलर्जीक सर्दी, होणारे श्‍वसनाचे आजार यांत ब्राह्मी रसायन किंवा ब्राह्मीचा काढा उपयोगी पडतो. पिंपळी, ज्येष्ठमध व ब्राह्मी यांचे मिश्रणापासुन तयार केलेला काढा कफाचा निचरा करण्यास लाभदायी ठरतो. छातीत कफ साठणे, वारंवार ढास लागणे, सर्दी कायम असणे यामध्ये ब्राह्मी, सुंठ, हळद व लेंडी पिंपळी यांचे मधात चाटण अत्यंत गुणकारी आहे.

रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविण्याकरिता ब्राह्मीच्या पानांचा उपयोग केला जातो. ब्राह्मीमध्ये असणारे बॅंकोसाईडस्‌ हे घटक शरीरातील ऑक्‍सिडेशन कमी करतात. तसेच रोगांना दूर ठेवणस मदत करतात. शरीरातील दाह व जळजळ कमी करण्यात ब्राह्मी उपयोगी आहे. ब्राह्मीमध्ये असणाऱ्या शीत गुणांमुळे दाहजन्य सर्व विकारांवर ब्राहमी काम करते.

शरीरातील पित्तवर्धक दोषांमुळे उत्पन्न रोगांवर ब्राहमी शमनकार्य करते. तसेच ताणतणाव कमी करणे व मानसिकरोगांवर उपचारांत ब्राह्मीचा वापर केला जातो. कॉर्टीसोल हे ताणतणावाशी निगडीत असणारे हॉर्मोन कमी करण्यात व शरीर संतुलन राखण्यात उपयोगी असणारे ब्राह्मी हे अत्यंत गुणकारी औषध आहे.

मुलांमध्ये स्मरणशक्‍ती बळकट करण्यात, विचारप्रणाली चांगली करण्यात व नको असलेले विचार कमी करण्यात ब्राह्मी काम करते. झोपेचे प्रमाण योग्य करून संपूर्ण दिनचर्या योग्य करण्यात चांगली आहे. ब्राह्मी तेलाचा वापर केसांसाठी उत्तम ठरतो. केसांचे गळणे कमी होते व रूक्षता कमी होऊन केश निरोगी व सतेज दिसतात.

उच्चरक्‍तदाबाच्या व्यक्‍तींमध्ये ब्राह्मी तणाव कमी करून रक्‍तसंचार चांगला करण्याचे काम करते. हृदयाला कमकुवत करणारे घटक शरीराबाहेर टाकुन बळकटी देण्याचे काम करते. रक्‍तवाहीन्यांवरील ताण कमी करून रक्‍तदाबावर नियंत्रण मिळवण्यात ब्राह्मी, लसुण, हळद व गुडुची या बरोबर उत्तम कार्य करू शकते.

ब्राह्मी कॅन्सर पेशीवर प्रभाव असणारी वनस्पती आहे. कॅन्सर पेशींची वाढ न होऊ देता मेंदु व फुफ्फंसाच्या कॅन्सर पेशींवर काम करते. शरीरातील सर्व कार्यप्रणाली उत्तमरित्या टिकविण्यासाठी ब्राह्मी अत्यंत लाभदायी आहे.

अल्झायमर्ससारख्या आजारांमध्ये ब्राह्मी हे वरदान स्वरूपात काम करते. स्मरणशक्‍ती वाढविणे. मेंदुतील अडथळे निर्माण करणारे घटक कमी करणे, उत्तेजना कमी करणे, तसेच ताणतणाव कमी करून मेंदुच्या कार्यात मदत करणे असे ब्राह्मी रसायनासारखे काम करते. ब्राह्मी बरोबर ज्योतीश्‍मती व वचा याचा वापर केल्यास अल्झायमर व स्मृतीभ्रंशाच्या पेशंटमध्ये चांगला फरक दिसून येतो.

ब्राह्मी रसायन, ब्राह्मी वटी, ब्राह्मी कल्प असे ब्राह्मी पासुन बनवलेली काही औषधे ही शरीरातील चयापचय सुधारून शरीरक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. ब्राह्मी ही पंचेंन्द्रियांना पोषण करणारी अशी वनस्पती आहे.