आता भाकरीही महागली…

सातारा  -वातावरणातील बदल, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे यंदा ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. मागणी व पुरवठा यातील तफावत व करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे यावर्षी भाकरी ज्वारीचे दर वाढले आहेत. दर वाढल्याने शेतकरी समाधानी असला तरी आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्यांची परवड होणार आहे.

खरीप हंगामात राजमा तर रब्बी हंगामात ज्वारी उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात ज्वारीचे उत्पादन कमी होऊ लागल्याने आणि उत्पादन व मागणीतील तफावतीमुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. ग्राहकांची उत्पादकांच्या घरोघरी ज्वारी विक्रीबाबत विचारणा सुरू आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या बहुतांश भागात आहे. ज्वारीचे क्षेत्र कमी होऊ लागल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी ज्वारीचे दर क्‍विंटलला 3500 ते 4200 रुपयांपर्यंत गेले आहेत.

वाढता भांडवली खर्च, मजुरांचा तुटवडा, वाढती मजुरी, प्रतिकुल हवामानामुळे रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट होत आहे. अशा संकटामुळे बहुतांश शेतकरी ज्वारीच्या उत्पादनाकडे पाठ फिरवित आहेत. ज्वारीने यंदा गव्हापेक्षा जास्त दर गाठला असल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याच वेळी लॉकडाऊनमध्ये इतर जीवनावश्‍यक वस्तूंबरोबर ज्वारीचेही दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक आणखी भरडला जाणार, हे मात्र निश्‍चित आहे.

ज्वारी खाण्याचे फायदे
ज्वारीमध्ये कर्बोदके (कार्बोहायड्रेट्‌स), खनिजे (मिनरल्स), तंतुमय पदार्थ (फायबर) यांचे प्रमाण मुबलक असते. ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. त्यातील निआसीनमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यात फायटोकेमिकल्स असल्याने हृदयरोग टाळता येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्वारीचे उत्पादन घेताना बियाणे, पेरणी, मशागत, औषध फवारणी, काढणी, मळणी यांचा एकत्रित एकरी खर्च सरासरी 15 हजार रुपये येतो. अनुकूल वातावरण असल्यास एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते. हे विचारात घेता ज्वारी उत्पादकांना नगण्य उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी ज्वारी उत्पादनाकडे पाठ फिरवित आहेत.
– सचिन भोईटे, प्रगतिशील शेतकरी, वाघोली.

Leave a Comment