लवळेत 68 वर्षांची परंपरा मोडीत; पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध

सरपंचपदी नीलेश गावडे, उपसरपंचपदी राऊत बिनविरोध

पिरंगुट – लवळे (ता. मुळशी) येथील सरपंचपदी नीलेश गावडे, तर उपसरपंचपदी रंजित राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक भोसले यांनी काम पाहिले. ग्रामविस्तार अधिकारी व्ही. डी. साकोरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

लवळे ग्रामपंचायतीने 68 वर्षांची निवडणुकीची परंपरा मोडीत काढीत पहिल्यांदाच यावेळची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. उद्योजक नाथाजी राऊत आणि माजी सरपंच संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईच्या वतीने नीलेश गावडे यांनी घेतलेला पुढाकार आणि ग्रामस्थांनी दाखविलेले सामंजस्य, ऐक्‍य व सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती.

या निवडणुकीत पक्ष बाजूला ठेवून सक्षम व सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या तरुण उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्यासाठी डॉ. विजय सातव, अशोक भोसले, तानाजी राऊत, बाळासाहेब टकले, राजाराम गावडे आदींनी, तसेच ग्रामस्थांनी सहकार्य व प्रयत्न केले. सरपंच व उपसरपंचपदासाठी अनुक्रमे नीलेश गावडे आणि रंजित राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निर्धारित वेळेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी सरपंच-उपसरपंचपदी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

रंजित राऊत हा युवक वयाच्या केवळ 24 व्या वर्षी उपसरपंच झाला आहे. लवळे ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यावेळी नवनियुक्त सदस्य संजय सातव, बाळू राऊत, वर्षा राऊत, सायली सातव, सारिका कळमकर, साधना सातव, अजित चांदिलकर, राहुल खरात, राणी केदारी, शिवराम सातव, नर्मदा टकले, किमया गावडे व सुजाता मोरे उपस्थित होते.

Leave a Comment