Breaking News : केदारनाथ मार्गावर भूस्खलन; 10 जण बेपत्ता

नवी दिल्ली – उत्तराखंडच्या केदारनाथ मार्गावर मुसळधार पावसानंतर दरड कोसळल्याचे समोर आले आहे. गौरी कुंडाजवळ ही घटना घडली. दरडीच्या या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती असून अद्याप 10 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
गौरी कुंड परिसरात गुरुवारी रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस सुरू होता.

त्यामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे. भूस्खलनानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत, खराब हवामानामुळे अडचणी येत आहेत. दुसरीकडे, हिमाचलमध्ये या पावसाळ्यात आतापर्यंत 199 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 बेपत्ता आहेत.

199 मृत्यूंपैकी 57 मृत्यू भूस्खलन आणि पुरामुळे झाले, तर 142 लोकांचा पावसाळ्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला. “या पावसाळ्यात हिमाचलला खूप नुकसान झाले आहे. आतापर्यंत 6563.58 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे,’ अशी माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिवांनी दिली आहे.

पावसामुळे आलेल्या पुरामुळे राज्यात 774 घरे पूर्णपणे उद्‌वस्त झाली आहेत, तर 7317 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 254 दुकाने आणि 2337 गोशाळांचेही नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, राज्यात 79 भूस्खलनाच्या घटना घडल्या.

राज्यात सुमारे 300 रस्ते बंद आहेत. 274 वीज आणि 42 पाणीपुरवठा योजना अजूनही ठप्प आहेत. पुढील दोन दिवसांत भारतीय हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी अलर्ट जारी केला आहे.