Bribe News: 4 हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले; जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापु एकनाथ रोकडे (५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.६) जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला होता. हे शासकीय अनुदान मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली आहे. ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार हे कृषी कार्यालयातील रोडके यांना भेटले. त्यावेळी रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली.