पोंदेवाडीत उजव्या कालव्यावर पूल बांधा

गैरसोय होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून होतेय मागणी

लाखणगाव – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत काठापुर, पोंदेवाडी शिव ते पोंदेवाडी – धामणी रस्ता या दरम्यान जवळपास तीन किलोमीटरच्या परिसरात कालव्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जलसंपदा विभागाने कालव्यावरील पूल बांधण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व ग्रामस्थांनी केली आहे.

उजव्या कालव्याच्या व डोंगराच्या मधील दोनशे एकर क्षेत्राकडे ये जा करण्यासाठी त्रास होत असून जलसंपदा विभागाने या ठिकाणी पूल बांधावा, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

अनिल वाळुंज यांच्यासह जयसिंग पोंदे, सुशांत रोडे, आनंदा पोंदे, वसंत रोडे, नानाभाऊ पोखरकर, शिवाजी पोंदे, संतोष ढमाले या शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पुलाची आवश्‍यकता आहे. तेथील जागेची पाहणी केली. येथील शेतकऱ्यांची पुलाची मागणी अनेक वर्षापासून रखडली असल्याने गैरसोय होत आहे.

कालव्यावर पुल उभारणीसाठी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना येथील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती अनिल वाळुंज यांनी दिली. पोंदेवाडी-धामणी रस्त्यावर पुल उभारला आहे. या दोन पुलांच्यामध्ये जवळपास चार किलोमीटर अंतरावर पुल नाही. शेतीमाल कालव्याला वळसा घालून काढावा लागतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पूल बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment