Brij Bhushan Case : ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ; आरोपांशी संबंधित फोटो पोलिसांच्या हाती, कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली :- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण फोटो व काही कागदोपत्री पुरावे लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात दाव्याला पुष्टी देणारे पुरावे तसेच काही फोटोंचाही समावेश करण्यात आला आहे.
आरोपपत्रात अनेक फोटोही सादर करण्यात आली आहेत व त्यावरून लैंगिक छळाची घटना घडलेल्या ठिकाणी ब्रिजभूषण उपस्थित होते.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ब्रिजभूषण यांच्यावर आयपीसीच्या कलम 506, 354 आणि 354 अ अंतर्गत लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी खटला चालवला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत.

आरोपपत्रानुसार अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या चार फोटोंमध्ये ब्रिजभूषण हे काही महिला कुस्तीपटूंसोबत कझाकिस्तानमध्ये उपस्थित होते. त्याचवेळी असे दोन फोटो आहेत ज्यामध्ये ब्रिजभूषण कुस्तीपटूंच्या अगदी जवळ असल्याचे दिसत आहे. फोटो, कॉल डिटेल्स आणि महासंघाकडून मिळालेल्या साक्षीदारांच्या रेकॉर्डच्या आधारे सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे सर्व स्पष्ट होत आहे.

ब्रिजभूषण यांनी मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या एका हातात ध्वज होता, म्हणून मी दुसऱ्या हाताने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. एकदा कुस्ती लीगमध्ये सेट हरल्यानंतर बॉक्‍समध्ये परतले तेव्हाही ब्रिजभूषण तिथे आले व त्यांनी मला जबरदस्तीने मिठी मारली. त्याने 15 ते 20 सेकंद मला घट्ट धरून ठवले होते, असे एका महिला कुस्तीपटूने आपल्या आरोपात नमूद केले आहे.

या घटनेच्या दोन्ही फोटोंमध्ये ब्रिजभूषण कुस्तीपटूंजवळ उभे असल्याचे दिसत आहे. तसेच महासंघाच्या कार्यालयात मला बोलावण्यात आले जेथे मी माझ्या प्रशिक्षकांसह गेले होते.ब्रिजभूषण यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले. मी त्यांना माझ्या दुखापतीबद्दल माहिती दिली त्याने मला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले, मात्र, यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले, असेही एका महिला कुस्तीपटूने म्हटले आहे.

ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी प्रशिक्षक आणि पीडित तरुणीसह ब्रिजभूषणही दिल्लीच्या त्या भागात उपस्थित असल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती
लागला आहे.

संघाच्या एकत्रित फोटोशूटदरम्यान ब्रिजभूषण यांनी चुकीच्या पद्धतीने हात पकडल्याचा आरोपही एका महिला खेळाडूने केला आहे. इतर खेळाडूंनीही असेच आरोप केले आहेत. आरोपपत्रात त्या पुराव्यांचा उल्लेख आहे ज्यावरून ब्रिजभूषण त्यावेळी तिथे उपस्थित होते हे सिद्ध होत आहे.

पत्रकारांशीही गैरवर्तन…

या सर्व घडामोडींबाबत ब्रिजभूषण यांना प्रश्‍न विचारण्यासाठी उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी गैरवर्तन केले. एका महिला पत्रकाराने माइक समोर केल्यावर तोदेखील ब्रिजभूषण यांनी फेकून दिला. तसेच काही पत्रकारांना धक्‍काबुक्‍कीही केली. आपल्या कारमध्ये बसत असताना हा प्रकार घडला त्यावेळी एका महिला पत्रकाराच्या हातालाही दुखापत झाली.