बसप खासदार दानिश अलींची हकालपट्टी ! ‘या’ कारणामुळे पक्षस्रेष्ठींनी घेतला निर्णय

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाने खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप पक्षाने दानिश यांच्यावर केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी याबाबत अमरोहा लोकसभा खासदार दानिश अली यांच्या हकालपट्टीच्या पत्रात लिहिले आहे की, दानिश अली यांना पक्षाची धोरणे, विचारधारा आणि शिस्तीच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करू नका, असे तोंडी सांगितले होते, परंतु त्यांनी सातत्याने पक्षाच्या विरोधात काम केले. त्यामुळे तुम्हाला पक्षात राहण्याचा अधिकार उरलेला नाही.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या विनंतीवरून दानिश अली यांना अमरोहा येथून बसपाचे उमेदवार म्हणून तिकीट देण्यात आले होते. बसपाचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाची सर्व धोरणे आणि सूचनांचे पालन करू, असे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन विसरून अली पक्षविरोधी कारवाया करत राहिले.

२१ सप्टेंबर रोजी लोकसभेत ‘चांद्रयान-३ चे यश आणि अंतराळ क्षेत्रातील भारताची उपलब्धी’ या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यानंतर खुद्द दानिश अली यांच्याशिवाय लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या अपरूपा पोद्दार, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कनिमोझी आणि इतर अनेक या सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंतीही या खासदारांनी केली होती.

या प्रकरणी भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्या संदर्भात बोललेल्या शब्दांबद्दल खेद व्यक्त केला होता. गुरुवारी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये दानिश अली आणि रमेश बिधुरी यांनी समितीसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडले. त्यानंतर दानिश अलि यांची त्यांच्याच पक्षाने हकालपट्टी केली आहे.