Budget 2024: देशात तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू होणार ; 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित करणार

Budget 2024: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात रेल्वेला एक अद्भुत भेट मिळाली आहे. गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, येत्या काही वर्षांत 3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधलेजाणार असल्याची मोठी घोषणा केली.

नव्याने बांधण्यात येणारे हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल. तसेच  40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने रेल्वेवर सर्वाधिक भर दिला होता. 2023 च्या एकूण 45 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रेल्वेचा वाटा 2.4 लाख कोटी रुपये होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतूद सातत्याने वाढली आहे.

5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 च्या अर्थसंकल्पात रेल्वेला 69,967 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये रेल्वेला 70,250 कोटी रुपये देण्यात आले. एका वर्षानंतर, म्हणजे 2021 मध्ये, पहिल्यांदाच रेल्वेचा अर्थसंकल्प 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला. तर 2023 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय वाटपाने प्रथमच 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.