दिल्लीत अतिक्रमणांच्या विरोधात बुलडोझर कारवाई सुरूच

नवी दिल्ली – उत्तर आणि दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली, त्यात मंगोलपुरी येथील नागरी स्टेडियमच्या भागाचा समावेश होता. तेथे अनेक जागांवर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. ती जमीनदोस्त केली जात आहेत.

ेशहीद भगतसिंग स्टेडियमवर मंगोलपुरी येथे कारवाई सुरू होती, जिथे आतील भागात काही लोकांनी अतिक्रमण केले आहे आणि आवारात गुरे बांधली आहेत असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. करोल बाग झोनमधील समयपूर बदली आणि प्रेम नगर येथेही अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू होती, जिथे यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बवाना भागातील मांसाची अनाधिकृत दुकानेही या कारवाईत हटवण्यात येत आहेत. पश्‍चिम दिल्लीच्या ख्याला भागात दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने अशीच बुलडोझर मोहीम हाती घेतली आहे.

पश्‍चिम दिल्लीतील सुभाष नगर आणि नजफगढ झोनमधील गोयाला डेअरी परिसरातही अशीच मोहीम हाती घेतली जाणार आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बेकायदेशीर बांधकामे आणि झोपड्यांवरील या कारवाईला असलेला विरोध आता तेथे कमी होताना दिसून येत आहे.