“…पण, बहुमत अहंकारानं चालत नाही “; शेतकरी आंदोलनावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचे आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले.

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट करण्यात येत आहेत. दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारे आंदोलन फक्त तीन राज्यांचे राहिलेले नाही देशातील सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन झाले आहे, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी राज्यसभेत मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांनी आदर आहे. केंद्र सरकारला देशानं बहुमत दिलं आहे. पण, बहुमत अहंकारानं चालत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट केला जातोय. ही बाब देशासाठी चांगली बाब नाही. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पंतप्रधानांसह सर्वांना दु:ख झालं आहे. लाल किल्ल्यावर अपमान करणारा दिप सिद्धू कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे. तो सिद्धू आतापर्यंत पकडला गेला नाही. मात्र, 200 पेक्षा जास्त शेतकरी आंदोलक पकडले गेले आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. 100 युवा शेतकरी आंदोलक कुठं आहेत. पोलिसांनी त्यांच्यासोबत काय केलय हे सांगावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. भारतात देशप्रेमी कोण आहे? अर्णव गोस्वामी देशप्रेमी आहेत का? त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी जाहीर केल्या, अशा गोष्टींना बळ देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. टीव्ही अँकर एका कॅबिनेट मंत्र्याबद्दल असं बोलतो हे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गेल्या 3 महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत. ते तीन राज्यांचं आंदोलन नसून देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. पंजाब जे शेतकरी मुघलांविरोधात लढतात. कोरोना काळात लंगर चालवतात ते तेव्हा ते देशप्रेमी असतात. पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं तर देशद्रोही कसे झाले, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आंदोलनही देशाची ताकद आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment