वडिलांना घे बोलावून… विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर तंबी

आंबेगाव – अल्पवयीन मुलांनी, मुलींनी वाहन चालविल्यास संबंधीत वाहन मालक, पालकांना तीन महिन्यांचा तुरंगवास तसेच 25 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर शहर, उपनगरांत पोलिसांनी कारवाई करीत घे वडीलांना बोलावून, तुरुंगात टाकायचे का, अशा शब्दांत समज देत विद्यार्थ्यांचे समपुदेशन कारवाई सुरू केली आहे.

विनापरवाना, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, बेशिस्त वाहन चालवणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांवर भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली. सरहद चौक, कात्रज चौक, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ चौक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना समुपदेश करण्यात आले. पोलीस आयुक्‍त व वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्‍त विवेककुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ही कारवाई करण्यात येत आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन शाळकरी विद्यार्थ्यांकडून नेहमीच केले जाते. अपघात व त्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. अल्पवयीन मुले मोटार सायकल चालवत असतात याकडे पालकांनी, संबंधित शाळेतील शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतः पाल्यांनी देखील काळजी घ्यायला हवी, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.