कोरोना पॉझिटीव्ह मातेचे दूध पिल्यास बाळालाही होऊ शकते का कोरोनाची लागण?

गेल्या दिड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. विशेष करून कोरोनाचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याने त्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्त्रांनी दिला आहे. पण त्याचबरोबर ज्या महिला कोरोना काळात आई झाल्या आहेत त्यांच्या मनातही अनेक शंका असून कोरोना पॉझीटिव्ह झाल्यास बाळाला दूध पाजावे की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने WHO स्तनदा मातांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार कोरोना पॉझीटीव्ह माता स्तनपान करू शकतात. कारण कोवीड पॉझीटिव्ह मातेचे दूध पिल्याने बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. पण तरीही स्तनपान करताना मातांना काळजी घेणे आवश्यक आहे. WHOने केलेल्या संशोधनानुसार आईच्या दूधामुळे बाळाचा कोवीड व्यतिरिक्त इतर आजारांच्या संसर्गापासून बचाव होतो.

आईच्या दूधातून बाळाला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाची लागम झाल्याची फार उदाहरणे नाहीत. पण तरीही बाळाला स्तनपान करताना आईने मास्क वापरावा. बाळाला पाजण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे. बाळाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

दरम्यान, कोरोना झालेल्या ज्या महिलांनी बाळाला जन्म दिला आहे त्यांच्यामुळे पहील्याच दिवशी बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना अद्याप घडलेली नाही. यामुळे व्हायरस मातेच्या माध्यमातून बाळापर्यंत पोहचत नाही असे अद्याप आढळले आहे. यामुळे मातेने बाळाला स्तनपान करण्यास काहीच हरकत नाही, असेही WHO म्हटले आहे.