खलिस्तानी पोस्टरवरून कॅनडातील मंत्री संतप्त; इंदिरा गांधींच्या हत्येची पोस्टर

ओटावा, (कॅनडा) – खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचे पोस्टर लावल्याबद्दल कॅनडाचील मंत्र्याने संताप व्यक्त केला आहे. हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकणार नाही आणि आपल्या देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देणे कधीही मान्य नाही, अशा शब्दात कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी खलिस्तानवाद्यांना खडसावले आहे.

या आठवड्यात, व्हँकुव्हरमध्ये भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे चित्रण करणाऱ्या पोस्टरच्या बातम्या आल्या. कॅनडामध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन देणे कधीही मान्य नाही,

असे त्यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कॅनडातील खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येची पोस्टर्स लावल्याबद्दल भारतीय वंशाचे कॅनडाचे संसद सदस्य चंद्र आर्य यांनीही अशीच चिंता व्यक्त केली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे पोस्टर लावून, त्यांच्या शीख अंगरक्षकांनी बंदुका रोखलेले मारेकरी त्यांच्यावर गोळ्या झाडतानाचे दाखवून हिंदू-कॅनडियनांमध्ये हिंसाचाराची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न खलिस्तानी समर्थक पुन्हा एकदा करत आहेत,

असा दावा आर्य यांनी केला. अशाच प्रकारची भीती दोन वर्षांपुर्वी ब्राम्पटन येथेही उत्पन्न केली गेली होती आणि काही महिन्यांपूर्वी शीख फॉर जस्टिसच्या पन्नूने हिंदूंना भारतात परत जाण्यास सांगितले होते, असेही आर्य म्हणाले.

पोस्टरमधील इंदिरा गांधींच्या कपाळावर बिंदी दाखवून खलिस्तानवाद्यांचे लक्ष्य हे हिंदू-कॅनेडियन होते, याची दुप्पट खात्री पटते आहे, यावर आर्य यांनी जोर दिला. जर अशा प्रकारांना वेळीच आळा घातला गेला नाही, तर संदेश देणाऱ्या पोस्टरमधील बंदुका आपल्याकडेही वळवल्या जाऊ शकतील, अशी शक्यताही आर्य यांनी वर्तवली आहे.

भारत विरोधी घोषणाबाजी…

अलीकडील खलिस्तान समर्थक घटनांमुळे भारत-कॅनडा संबंध बिघडले आहेत. गेल्या महिन्यात, काही खलिस्तानी समर्थकांनी कॅनडातील ओंटारियो गुरुद्वारा समितीने आयोजित नगर कीर्तन परेड दरम्यान भारतविरोधी घोषणा दिल्या होत्या.

यावर, परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त केला होता आणि हिंसेचा उत्सव आणि गौरव सभ्य समाजात स्वीकारले जाऊ नये, असे म्हटले होते. कॅनडात गेल्या काही वर्षांत खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवायांच्या अनेक घटना घडल्या आहेत.