पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवा

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मागणी : राजगुरुनगरात विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी
राजगुरूनगर :
पोलीस खात्यात राज्यात 17 हजार पदे भरण्यात येणार आहे. ही भरती होत असताना उमेदवाराला केवळ एकाच घटकासाठी अर्ज करता येणार आहे. पोलीस होण्यासाठी सराव, कसरत करणाऱ्या उमेदवारावर शासन अन्याय करीत आहेत.

पोलीस भरती अर्ज वेगवेगळ्या घटकासाठी करण्याची शासनाने परवानगी द्यावी. आवेदन पत्र, ऑनलाइन सादर करताना वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी राजगुरूनगर येथे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवारांनी खेड तहसीलदार यांना निवेदन देत शासनाकडे आंदोलन केले.

राजगुरुनगर येथे सुमारे दोन हजार मुले, मुली दररोज येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात शारिरीक चाचणी सराव करीत असतात. ते दोन वर्षे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते. महाराष्ट्रात 17 हजार जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात काढली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्‍त पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरणार आहेत.

यावेळी 34 जिल्ह्यासाठी एक अर्ज व मुंबईसाठी एक असे दोनच अर्ज उमेदवारांना भरता येणार आहेत. एकाचवेळी परीक्षा, शारीरिक चाचण्या होणार असल्याने पूर्वीसारखे जिल्हानिहाय वेगवेगळ्या तारखेला तेथे जाऊन भरती होता येणार नाही. भरती प्रक्रिया अन्यायकारक ठरली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी पूर्वी प्रमाणे भरती करावी व त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करता यावा अशी मागणी निवेदनात करण्यात अली आहे.

हर्षदा शिवेकर, आकाश शिंदे, सचिन चव्हाण, अशोक वंजारे यांनी मागणी केली. यावेळी पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विवद्यार्थ्यांनी खेड तहसीलदार कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय शिंदे याना दिले यावेळी जया मडके, दिव्या रौंधळ, कल्याणी नाईकरे, ऋतुजा मोरे, हर्षदा शिवेकर, कुणाल पवार, बाळनाथ माळी, श्रीकांत दाभाडे, महेश पानसरे, सोमनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस भरती सराव करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

पोलीस भरती प्रक्रियेत केवळ एक अर्ज भरण्याची मर्यादा दिल्याने ग्रामीण भागातील मुलींवर अन्याय झाला आहे. चार पाच वर्षे आम्ही पोलीस सराव करीत आहेत. अनेक मुलींची लग्ने झाली आहेत. आम्हाला एकच संधी दिली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पोलीस भरतीसाठी एकापेक्षा जास्त आवेदन सादर करण्याची परवानगी द्यावी. महिला उमेदवारांवर अन्याय करू नये.
– जया मडके, पोलीस भरती उमेदवार.