डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचे प्रकरण: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, दि. २९ – महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडुन विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत भिमराव बबन साठे ( वय ४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणावर सध्या राजकारण तापलं आहे. याला विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याकाठी बुधवारी आंदोलन केले.

हे आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचं उघड झालं. यानंतर आव्हाड यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. अनवधनाने झालेल्या या घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांना माफी मागितली आहे. दरम्यान अशा प्रकारे वर्तन करुन जितेंद्र आव्हाड यांनी जाती – जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलेले आहे. म्हणुन देशभरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

सदरची ही घटना सोशल मिडीया व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातुन सगळीकडे प्रसारीत होत आहे. व ती मी प्रसारमाध्यमाव्दारे पाहीली असल्याचे साठे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार आव्हाड यांच्यावर भा. द. वि. कलम १५३, १५३ (अ), २९५(अ), ५०४, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहेत.