सापुतारा : बाराही महिने स्वर्गीय अनुभव

रोजच्या धावपळीतून एखादा लॉँग विकेंड आला की, सगळे आनंदी होतात आणि बाहेर जाण्याचे नियोजन सुरू होते. काही जण ही सुट्टी घरच्यांसोबत घालवतात तर, काही बाहेर दौरा काढतात. तरुण मंडळीना फिरण्याची आवड असल्याने नेहमीच नवीन स्थळांच्या शोधात असतात. असेच एक ठिकाण निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सापुतारा हे ठिकाण नक्कीच प्रत्यक्ष स्थळी जाऊन भेट देण्यासारखे आहे.

सापुतारा हे ठिकाण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर व मुंबई आणि नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील व गुजरात राज्यातील पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणी सहलीचा बेत आखतात. निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या असंख्य पर्यटनस्थळाला दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी नेहमीच वाढताना दिसत असते. त्यापैकीच एक डांग जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी वस्ती असल्यामुळे आतापर्यंत पर्यावरणाला कुठलीही झळ किंवा इजा पोहोचलेली नाही. त्यामुळे इथलं निसर्गसौंदर्य अजूनही चिरतरुण राहिलेले आहे. परंपरा आणि नावीन्यता यांची जपणूक करत इथल्या मंडळींनी सापुतारा हे आकर्षक बनवले आहे. आधुनिक पर्यटन शैलीत येणा-या गोष्टीदेखील या ठिकाणी उपलब्ध आहेत.

डोंगराळ रांग, सुंदर सरोवर, डांग जंगल, पूर्णा अभयारण्य, न्याहाळत राहावा असा सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्या सोबतीला नयनरम्य महादेवाचे मंदिर, वस्तुसंग्रहालय, शिल्पाचे सौंदर्य, वनवाटिका, मिलेनियम गार्डन, पुष्पक रोप वे, हनी सेंटर, रोड गार्डन, फॉरेस्ट नर्सरी, स्वामी नारायण मंदिर, गव्‍‌र्हनर हिल, लाँग हट, जैन मंदिर अशा गोष्टी पर्यटकांना भुरळ पाडतात. तिथून जवळच निरा धबधबा, वणीचे मंदिर, हतगड किल्ला, शबरी मंदिर अशी स्थळंदेखील आपले मन मोहून टाकतात. इथं अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. त्यापैकी सापुतारा तलाव हे तर सापुता-याचे विशेष आकर्षण म्हणावे लागेल. याशिवाय स्टेप गार्डन, रोज गार्डन, सनसेट पॉइंट, पुष्कर रोप वे अशी इथं असलेली अनेक ठिकाणं पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. सापुतारा मान्सून फेस्टिव्हल हा गुजरात टुरिझम फेस्टिव्हलचाच एक भाग, हिरवाई, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, वनसंपदा, क्राफ्ट व्हिलेज म्हणजे कलाकारांचं खेडं. इथं पर्यटक स्थानिक कलाकुसर बघू शकतात आणि खरेदीचा आनंद ही लुटू शकतात. बांबूपासून बनवल्या जाणा-या विविध कलाकुसरीच्या वस्तू या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या जातात. इथे फोटो गॅलरी असून तेथे गुजरातमधल्या अनेक पर्यटन स्थळांचे फोटोज बघायला मिळतात.

सापुता-याचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे रोप वे ने सापुता-याच्या एका कडय़ावरून दुस-या कडय़ावरचा प्रवास चित्तथरारक वाटतो. याशिवाय बोटिंग ही करता येते. सापुता-या मधील आदिवासी संस्कृतीला कुठेही धक्का न लावता गुजरात टुरिझमने सापुता-याचा केलेला विकास उल्लेखनीय आहे. आऊटिंगसाठी सापुतारा स्वस्त आणि मस्त पर्याय येथे आहे.

गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातच्या रत्नजडित मुकूटाची उपमा दिली तरी त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही. दोन्ही बाजूंनी दाट जंगलांमधून चाललेल्या बसमधून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत सापुतारा येथे आपण पोहोचतो.

सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे. साप – उतार, म्हणजेच सापाचे निवासस्थान. वृद्धलोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की, प्राचीन काळात येथे सर्पगंगानदी वाहत होती. ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले. उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात.

सापुतारा हे जरी थंड हवेचे ठिकाण असले तरी, येथील वातावरण संपूर्ण वर्षभर आल्हाददायक असते. म्हणून वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते. होळी, रंगपंचमी, दिवाळी, नाताळ, संक्रांत इ. सणांना येथे खास उत्सव साजरे केले जातात. पावसाळ्यात तर सापुता-यातील दृश्य सर्वात नयनरम्य असते. ढग, पाऊस व धुक्याचा अनोखा व अदभूत अनुभव तेथे पर्यटकांना अनुभवण्यास मिळतो. काश्मीरसारखा अद्भूत अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी सापुता-यात असते. याशिवाय ट्रेकिंगसाठी अनेक गड व किल्ले आहेत. म्हणून साहसी पर्यटनालाही येथे मोठा वाव आहे. त्याच-त्याच पर्यटन स्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांना सापुतारा निश्चितच नवा अनुभव देईल.

Leave a Comment