पुणे | दिव्यांगांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग कल्याणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे सेंटर एसएसपीयूच्या मदतीने व राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या निर्मितीसाठी राज्य दिव्यांग कल्याण विभाग निधी उपलब्ध करून देईल, असेही ते म्‍हणाले.

दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा दिव्यांग कल्याण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क आणि बालकल्याण संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय कार्यशाळेचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, उद्योजक प्रतापराव पवार,

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरु डाॅ. पराग काळकर, कुलसचिव डाॅ. विजय खरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे दीपक करंदीकर, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे महासंचालक डॉ राजेंद्र जगदाळे, दिव्यांग कल्याण विभाग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यशाळेतील उपस्थितांना संबोधित केले.

बच्चू कडू म्हणाले, राज्यात दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाकडे देण्याबरोबरच याच्या योग्य अंमलबजावणीसाठी या विभागाला स्वतंत्र संचालक असायला हवा. संचालक नियुक्ती करताना शक्यतो सैन्य दलातील माजी अधिकाऱ्यास प्राधान्य द्यावे. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी समर्पित वृत्तीने सामुदायिक प्रयत्नांची देखील गरज आहे. कुलगुरु गोसावी म्‍हणाले, दिव्यांग व्यक्तींना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यावर आमचा कायमच भर असेल व यासंबधी आवश्यकती सर्व मदत विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल.