केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी भरीव पॅकेज द्यावे : शंभूराज देसाई

सणबूर  (वार्ताहर) – राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेकरीता केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी माजी केंद्रिय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीनुसार केंद्र शासनाने यावर धोरणात्मक निर्णय घेवून अडचणीत सापडलेला सहकारी साखर उद्योग सावरण्याकरीता भरीव पॅकेज दयावे, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारांच्यावतीने केली आहे.

देशाचे माजी कृषीमंत्री खा. शरद पवार पंतप्रधान मोदी यांना अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखानदारीला वाचविण्याकरीता दिलेल्या लेखी पत्राच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पवारसाहेबांच्या मागणीला दुजोरा देत याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे म्हटले आहे. तीन वर्षापासून महाराष्ट्रातील साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक अडचणीमधून जात आहे. जागतिक आणि देशातंर्गत बाजारापेठांमध्ये मोठयाप्रमाणात साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे सर्वच सहकारी साखर कारखाने अडचणी आहेत. याबाबत पवारसाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सविस्तर पत्रव्यवहार केला आहे. पवारसाहेबांच्या विनंतीनुसार केंद्राने यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा व सहकारी साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी ना. शंभूराज देसाई यांनी केली आहे.

Leave a Comment