चंद्राबाबू, ममता, मायावती पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार – शरद पवार

एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे एनडीए बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 2014मध्ये लोकांनी बहुमत दिले. असेच काहीसे एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घडू शकते. कारण दीर्घकालीन मुख्यमंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे तीन पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय मला सध्या दिसत आहेत, असे पवार म्हणाले.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत, असे मी म्हणत नाही. मायावती, ममता आणि नायडू हे मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिलेले उमेदवार आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी ते देखील योग्य पर्याय ठरू शकतात, असेही पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मी शर्यतीत नाही
दरम्यान, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राष्ट्रवादी फक्त 22 जागा लढत आहे, या सर्व जागा आम्ही जरी जिंकल्या तरी बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही. तसेच राहुल गांधींपेक्षा या तीन उमेदवारांना प्रबळ दावेदार मानता का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक आहे.

शिवसेनेने उडविली खिल्ली
आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये या तिघांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी या तिघांच्या नावाचा उल्लेख करुन पवारांनी त्यांची खिल्ली उडवल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. हे कोणीच पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. ज्या अर्थी पवारांनी राहुल गांधी यांचे नाव घेतले नाही त्याचा अर्थ युपीएचा पराभव होणार हे निश्‍चितपणे पवारांनी दिसले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी आणि पवारांची एकही एकत्र सभा झाली नाही, हे गंभीर असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेसची सावध प्रतिक्रिया
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत असताना कॉंग्रेसने यावर सावध प्रतिक्रिया दिली. निकाल लागल्यानंतर जेव्हा आकडे समोर येतील. त्यानंतर सर्व समिकरणं निश्‍चित करण्यात येईल, असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले.

Leave a Comment