Chandrababu Naidu: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे नशीब आणि कंपनी उजळली आहे. पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी, या कंपनीच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
कोविड काळापासून मोठ्या झटक्यांचा सामना करत असलेल्या या FMCG क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मोठी वाढ नोंदवली. या कंपनीत नारा भुवनेश्वरी यांची सुमारे 24.37% भागीदारी आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 2,26,11,525 शेअर्स आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी 1992 मध्ये या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये दूध, दही, लस्सी, पनीर, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. नारा भुवनेश्वरी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असतानाही हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि त्यानंतर सलग पाच दिवस त्यांच्या शेअर्समध्ये नेत्रदीपक वाढ झाली. शुक्रवारीही शेअरचे भाव वधारले आणि प्रति शेअर 659 रुपयांवर पोहोचले. हेरिटेज फूड्सच्या शेअरची किंमत गेल्या पाच दिवसांत 256.10 रुपयांनी वाढली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा एन लोकेश यांच्या संपत्तीतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. लोकेशही या कंपनीचा प्रवर्तक आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी आले त्याच दिवशी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकालही आले आहेत. या निकालांमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी 10 वर्षांनंतर राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. 175 सदस्यांच्या आंध्र विधानसभेत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने 135 जागा जिंकल्या आहेत.