महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून रुग्णांची विचारपूस

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या लाखो अनुयायांना उन्हाचा त्रास झाला असून यातील ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होतं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. पण, आज ४२ अंश सेल्सियस तापमान असल्याने पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली.  या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 123 हून अधिक लोकांना तीव्र उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला लाखो अनुयायी उपस्थित होते. या कार्यक्रमास सकाळी 11.30च्या सुमारास सुरू झाली. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता.

याप्रसंगी उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था उघड्यावर करण्यात आली होती. यामुळे तीव्र उष्णतेमुळे कार्यक्रमादरम्यान एकूण 123 जणांना डिहायड्रेशनसारख्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये पाठवण्यात आले. यापैकी 13 रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली होती. त्यात सात ते आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. उपचारधीन असलेल्या अनुयायांचा खर्च सरकार करणार आहे,” अशी माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.