पुणे जिल्हा | किलबिल स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात

माळेगाव, (वार्ताहर)- किलबिल हाऊस प्ले स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सात वर्षाची संस्कार आणि नितीमूल्ये यांचे शिक्षण देण्याची परंपरा असलेले किलबिल हाऊस प्लेस्कूलने ९ मार्चपासून आठव्या वर्षात पदार्पण केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कृतीचा वारसा घेऊन राजे अमरसिंह कॉलनी गार्डन माळेगाव या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन पालकांच्या उपस्थित तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत वाल्मिकी रामायणाला उजाळा देत मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी किलबिल हाऊसच्या चिमुकल्यांनी अगदी बाल रामायण ते रामवनवास पर्यंत दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित विविध नृत्य व नाटिका सादर केल्या. कार्यक्रमासाठी सोमेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीतील आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त प्राजक्ता यादव, विनोदकुमार गुजर, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त मनीषा संदीप लोणकर, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. हर्षदा धायगुडे व सई मॅटर्निटी हॉस्पिटलच्या डॉ. वनिता कोकरे , किलबिल हाऊसचे संस्थापक पांडुरंग कदम, सुनंदा कदम उपस्थित होते.

यावेळी बक्षीस वितरण सोहळ्यात शाळेतील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक व इतर कर्मचारी यांना देखील विविध पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.