पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

पिंपळवंडी/आळेफाटा, (वार्ताहर) – काळवाडी (ता.जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

काळवाडी येथे यात्रेनिमित्त मामाच्या गावी आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय 8, रा. मूळगाव बदगीबेलापूर, ता.अकोले) सकाळी साडेआठच्या सुमारास आजोबा रोहिदास काकडे यांच्यासोबत शेतात गेला होता. जनावरांसाठी कडबा कुट्टी चे काम सुरू असताना शेजारी असलेल्या ऊसातून बिबट्याने रुद्र फापाळे या बालकावर अचानक हल्ला करून मान पकडली.

व उसात ओढत घेऊन गेला. बिबट्याने केलेले हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू होण्याची ही सलग दुसरी घटना घडली असल्याने काळवाडी ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथील एका तरुणीवर बिबट्याने हल्लाकरून तिला गंभीर जखमी केले होते. पिंपळवंडी ते काळवाडी हे अंतर अवघ्या तीन किलोमीटरचे आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी उंब्रज येथील साडेतीन वर्षीय बालक देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला होता. महिन्यापूर्वी शिरोली येथील एका मेंढपाळाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता.

बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांच्या मृत्युचे सत्र जुन्नरमध्ये खुप वर्षांपासून सुरू आहे. याबाबत शेतकरी वनविभागाला सहकार्य देखील करत होते. आता मात्र बिबट्यांचे मानवावर होणारे हल्ले वाढले असून यात लहान बालकांना हकनाक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. लवकरात-लवकर यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जुन्नर तालुक्यामध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभाग देखील हतबल झाल्याचे नेहमीच दिसून येत आहे.

बिबट्यांना शूट करा – शेरकर
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याने मानवावरचे हल्ले वाढू लागले आहेत. जनतेचा उद्रेक लक्षात घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे, नसबंदी बाजूला ठेवून बिबट्यांना शूट करण्याची मागणी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली आहे. यावेळी स्थानिकांचा मोठा जमाव उपस्थित होता. तालुक्यातील वनविभाग बंद करून शासनाला बिबटे आटोक्यात येत नसतील तर कारवाई जनतेच्या हातात द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वनविभागाने काळवाडी परिसरात दहा पिंजरे, ट्रॅप कॅमेरे बसविले असून ड्रोनच्या साह्याने बिबट्यांचा शोध सुरू केला आहे. याशिवाय वनविभागाची पेट्रोलिंग सुरू आहे. वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

घडलेली घटना दुर्दैवी असून वनविभागाला यापुर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा काळवाडी येथे लावावा अशी मागणी मी केली होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तसेच ही घटना घडल्यानंतर देखील वनविभागाचे अधिकारी घटना ठिकाणी लवकर हजर झाले नाहीत. वनविभाग या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यावरून दिसत आहे. – तुषार वामन, सरपंच, काळवाडी