चीनचा आक्रमणाचा प्रयत्न

नवी दिल्ली – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने सर्वात सक्षम अशी जे-20 विमाने पुन्हा लडाखमध्ये तैनात केली. त्यानंतर चीनी सैन्याने नव्या ठिकाणी आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारच्या उत्तर रात्री घडला. त्यानंतर भारतीय जवानांनी चुशूल नदीच्या किनाऱ्यावर चीनी आक्रमणाचा हा प्रयत्न हाणून पाडला.

जे 20 विमाने होतान हवाई तळावर तैनात करण्यात आली असून ती भारतीय हद्दीच्या अगदी जवळ उड्डाण करत होती. मात्र बॉम्बिंग करू शकणाऱ्या या विमानांनी अद्याप भारतीय हद्द ओलांडली नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एएमआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

चीनने या पुर्वी होतान आणि गरगुन्सा विमानतळावर जे 20 विमाने तैनात केली आहेत. भारतात पाच राफेल विमानांचा ताफा दाखल होताच चीनने ही कृती केली आहे. जे 20 सह अन्य विमानांनी लडाखच्या सभोवती सराव केला. त्यात होतान आणि गरगुन्सा विमान तळांवरील लढाऊ विमानांचा समावेश होता. 

लष्कराचे प्रवक्ते अमन आनंद म्हणाले, राजनैतिक पातळीवर आणि लष्करी पातळीवर लष्कर ठेवण्याचे मान्य केलेल्या ठिकाणी पीएलएकडून उल्लंघन सुरू आहे. त्याच्या हालचाली आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक आहेत. ही सीमा बदलण्याचा एकतर्फी केलेला प्रयत्न आहे.

Leave a Comment