नाकातून दिली जाणार लस

बीजिंग – ज्या चीनमधून पसरलेल्या करोनाने जगभरात धुमाकुळ घातला आहे, त्याच चीनने आता करोनावर औषध तयार करण्याच्या बाबतीत एक पाउल आणखी पुढे टाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने नाकाचा स्प्रे तयार केला आहे. हा नॅसल स्प्रे लशीसारखे काम करणारा असून त्याच्या चाचणीला मंजूरी देण्यात आली आहे.

चीनच्या अधिकृत माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार नाकाद्वारे स्प्रेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या लशीची क्‍लिनिकल चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याकरता अगोदरच 100 स्वंसेवकांची भरती करण्यात आली आहे.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार हॉंगकॉंग आणि चीनने संयुक्तपणे ही लस तयार केली आहे. याबाबत माहिती देताना हॉंगकॉंग विद्यापीठाचे मायक्रोबायोलॉजिस्ट युएन क्‍वाय युंग म्हणाले की, ही लस नाकावाटे आपल्या शरिरात जाते आणि प्रतिकार प्रणाली सक्रिय करते. नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लशीचे दोन फायदे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशी लस एन्फ्लूएन्झा आणि करोना या दोघांना रोखण्यात ती उपयुक्त आहे.

एखाद्या व्यक्तीमध्ये एच 1 एन 1, एच 3 एन 2 अथवा अन्य एन्फ्लूएन्झा विषाणू असतील तर तेही यामुळे सामप्त होतील. मात्र या प्रकाराच्या लशीच्या तीन टप्प्यातील चाचण्या पूर्ण व्हायला किमान एक वर्ष लागणार आहे.

Leave a Comment