चिपळूण, महाडवासियांना येत्या काळात पुराचा सामना करावा लागणार नाही – जयंत पाटील

चिपळूण – राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाची संपूर्ण यंत्रणा चिपळूण, महाड येथील नद्यांचा गाळ काढण्यासाठी झोकून काम करत असून जलसंपदा विभाग हे गाळ उपसा उद्दिष्ट्य पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच चिपळूण, महाडवासियांना येत्या काळात पुराचा सामना करावा लागणार नाही, अशी खबरदारी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राज्याच्या जलसंपदा विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदी व शिव नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी चिपळूण येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गेल्या वर्षी रायगड, महाड, चिपळूण आणि आजुबाजूच्या परिसरात अतिवृष्टी झाली आणि या तालुक्यांना पुराचा सामना करावा लागला. या भागातील नद्यांमध्ये साचलेला गाळ हा पूर येण्याच्या विविध कारणांपैकी एक कारण आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पूर टाळता यावा म्हणून आम्ही गाळ उपसा करण्याची भूमिका घेतली असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत 4 लाख क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे, तर पावणे आठ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य आहे. या कामासाठी आतापर्यंत 12 फोकलेन काम करत होते तर आता अधिकचे 14 फोकलेन आणि 30 टीपर आणले गेले आहेत. चिपळूणबरोबरच महाडमध्येही हे काम सुरू राहील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.