सीआयडी कर्मचाऱ्याची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट,पोलिसांकडून तपास सुरु

औरंगाबाद :  औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागातील शिपायाने रेल्वे स्थानकावर सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. काल म्हणजे सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली असून, या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल सोनवणे असे मृताचे नाव आहे. तर लोहमार्ग पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे हे 2018 पासून सीआयडी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. ते अनुकंपा धर्तीवर नोकरीला लागले होते. त्यांची मुलगी अभ्यासात हुशार आहे. गतवर्षीच तिचा नर्सिंगच्या शिक्षणासाठी शासकीय कोट्यातून मुंबई येथे नंबर लागला आहे.

तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी आर्थिक मदतही केली होती. दरम्यान, 23 जानेवारीला सकाळी सीआयडी कार्यालयात चाललो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले. मात्र, ते कार्यालयात न जाता ते रेल्वे स्थानकावर गेले. दुपारी प्लॅटफॉर्म क्र. 2 वर आलेली सचखंड एक्स्प्रेस रेल्वे पुढील प्रवासासाठी निघताच सोनवणे पलीकडील बाजूने धावत आले आणि रेल्वेसमोर उडी घेतली.

ज्यात काही क्षणांत रेल्वे त्यांच्या अंगावरून गेली. हा प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मृतदेह घाटीत नेला. त्यांनी रल्वे स्थानकावर जाऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  अशाप्रकारे टोकाचे पाऊल त्यांनी का उचलेले याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.