nagar | विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा, महावितरणविरोधात नागरिक संतप्त

पारनेर, (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या दरम्यान परिसरात विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा उडाला असून, महावितरणविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सुमारे १० ते १२ गावांचे केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात गेल्या दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विज बिल भरण्यासाठी जशी तत्परता दाखवता तशी वीजपुरवठा खंडीत झाल्यावर का दाखवत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणचे अभियंता व कर्मचारी अपयशी ठरत असून, डासांमुळे व भयंकर उष्णतेमुळे नागरिकांना रात्र रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे.

चालूवर्षी पावसाळा मे महिन्यातच सुरू झाला आहे. शेतीसाठी सोडा पण पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. थोडे फार पिण्यासाठी पाणी निघते मात्र त्यासाठी विद्युत पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

सुपा ४३ केव्ही उपकेंद्रातून सुपा शहर, औद्योगिक वसाहत, कोल्हेवस्ती, वाळवणेसह कडूस फिडरसाठी आपधूप, वाघुंडे, बाबुर्डी, रुईछत्रपती, भोयरे गांगर्डा, कडूस आदी ठिकाणी शेती पंप व सिंगल फेज (घरांसाठी) विद्युत पुरवठा केला जातो.

या भागात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिण्याच्या पाण्यासह या गावांचा संपर्क तुटला आहे. विजेवर चालणारे विविध कंपन्यांचे मोबाईल टाॅवर बंद झाल्याने सर्व व्यवहारच कोलमडले आहेत. दोन दिवसांपासून मोबाईल चार्ज करण्याइतपत विद्युत पुरवठा होत नसल्याने महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाचे वातावरण झाले की पुरवठा बंद
सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, मात्र पावसाचे वातावरण झाले किंवा वारा सुटला तरी आपधूप, रुईछत्रपती, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस आदी गावांचा विद्युत पुरवठा बंद केला जातो. सुपा शहरात पाऊस चालू झाला तरी कडूस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केला जातो. मग महावितरणचे कर्मचारी करतात काय ? असा प्रश्न उपस्थित करून यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या संघर्षाला महावितरणला सामोरे जावे लागेल.

ग्रामस्थांनी रात्र काढली जागून
चालूवर्षी उष्णतेचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे, त्यामुळे रात्री व दिवसा भयंकर उष्णता जाणवते. शनिवारी महावितरण कंपनीच्या वतीने १० ते २:३० वेळेत विद्युत पुरवठा कामानिमित्त बंद केला जाईल, असे जाहीर केले.

मात्र, विद्यूत पुरवठा हा सायंकाळी सात वाजता सुरळीत चालू झाला. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता पावसाचे वातावरण निर्माण झाले. दहा मिनिटे पाऊसही झाला मात्र विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना उष्णतेमुळे रात्र जागून काढावी लागली.