नगर : ॲड. आढाव हत्याकांडाचा तपास सीआयडीतर्फे करा

वकील संघटनेची मागणी
नगर –
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पोलिसांकडून सांगितले जाणारे कारण संयुक्त वाटत नाही. राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी.) मार्फत या हत्याकांडाचा तपास करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व वकिल संघटनांच्या वतीने प्रशासनाला मंगळवारी (दि.३०) निवेदने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालक सदस्य ॲड. उदय वारूंजीकर यांनी मानोरी येथे ॲड. आढाव कुटुंबाचे सांत्वन केले. अहमदनगर येथील वकील संघटनेने या हत्याकांडामुळे दिवसभर न्यायालयातील कामकाजात सहभागी न होता, शोकसभा घेण्याचा निर्णय घेतला. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा न्यायालयातील तळमजल्यामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. उदय वारूंजीकर अध्यक्षस्थानी होते. शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड नरेश गुगळे, सेंट्रल वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक कोठारी, कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. भूषण बऱ्हाटे, उपअध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, ॲड संदीप शेळके, ॲड संजय सूंबे, ॲड शिवाजी शिरसाठ, ॲड भक्ती शिरसाठ, ॲड सारस क्षेत्रे, ॲड अमोल अकोलकर, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड देवदत्त शहाणे, ॲड. अनिता दिघे, ॲड. स्वाती नगरकर, ॲड. संजय पाटील, ॲड. वैभव आघाव आदी उपस्थित होते.

ॲड. आढाव हत्याकांडातील आरोपींचे कोणीही वकीलपत्र न घेण्याचा ठराव यावेळी सर्वसंमतीने घेण्यात आला. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी ही मागणी करण्यात आली. खंडणीवरून हत्याकांड झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. हे कारण संयुक्तिक वाटत नसल्यावर अनेक वकिलांनी आक्षेप घेतला.

या गुन्ह्याचा तपास सी.आय.डी.मार्फत करण्याची मागणी करण्यात आली. राज्यातील प्रत्येक तालुका वकील संघटनेच्या वतीने तहसीलदार तर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.३०) निवेदन देण्याचा निर्णय झाला. वकील संरक्षण कायदा त्वरीत लागू करावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. अहमदनगर येथील वकिलांनी खासगी बस करून मानोरीत जाऊन आढाव कुटुंबीयांच्या सात्वंन केले.या कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.