नगर | संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका : प्रा.सुभाष शेकडे

नगर – संत एकनाथ महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे केलेले संशोधन हे पहिले संशोधन. सर्व संत मंडळींनी या भूमीला ज्ञानाचे विलोभनीय दान दिले आहे. चिकित्सक पणे संशोधन करून मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाज हितासाठी करावा. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन संशोधन करून संदर्भ गोळा करा. संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका. आपल्याच कष्टातून पूर्ण झलेल्या संशोधनाने येणारा आनंद खुप काही देवून जातो. ज्या महाविद्यालयाच व्यवस्थापन उत्तम तेथे शिस्त, शैक्षणिक प्रगती उत्तम असते. हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी करीत असलेले निस्वार्थी कार्य खर्च कौतुकास्पद आहे. अलीकडे शैक्षणिक संस्थांमध्ये असे निस्वार्थी कार्य दिसत नाही, असे प्रतिपादन लोकसाहित्य व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.सुभाष शेकडे यांनी केले.

पेमराज सारडा महाविद्यालयात पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या महिनाभर च्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या विद्यावाचस्पती कार्याभ्यास कोर्सची उत्साहात सांगता झाली. यावेळी लोकसाहित्य व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.सुभाष शेकडे यांनी कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस होते. यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन सुमतिलाल कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, संचालक डॉ.पारस कोठारी, प्राचार्य डॉ.महेश्वरी गावित, प्रबंधक अशोक असेरी,पर्यावेक्षक सुजित कुमावत, प्रा. प्रकाश जाधव, ज्येष्ठ कवी व संशोधन केंद्राचे विद्यार्थी चंद्रकांत पालवे आदींसह प्राध्यापक व कार्याभ्यासमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थित होते. विविध महाविद्यालयांचे ३० हून अधिक संशोधन करणारे विधार्थी या कोर्समध्ये सहभागी झाले होते.