नगर | सीना नदीतील अतिक्रमणांवर ‘मनपा’चा हातोडा

नगर |  महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील काटवन खंडोबा परिसरातील गाझीनगरजवळील गट क्रमांक ३८ मधील एकाडे सॉमीलसमोर सीना नदीपात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंटचे वॉल कम्पाऊंड व दोन पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटविले. दरम्यान, सीनाच्या हरित पठ्यातील इतरही अतिक्रमणे मनपाच्यावतीने हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सीना नदीलगत असलेल्या गाझीनगर परिसरात नदीच्या हरित पठ्यात बेकायदेशीर रेखांकने तयार करून अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. याबाबत स्थानिक नागरिकाने हरित लवादाकडे तक्रार केली होती. एप्रिल २०२३ मध्ये यावर सुनावणी होऊन हरित लवादाने सीना नदीच्या हरित पट्यातील अतिक्रमणे ९० दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिले होते. मध्यंतरी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हे अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली तेव्हा अतिक्रमणधारकांनी तीव्र विरोध केला होता. स्थानिकांनी नदीपात्रालगत सिमेंटचे कम्पाऊंड करून शेती व इतर कामांसाठी त्याचा वापर सुरू केला होता.

बुधवारी मात्र, अतिक्रमणधारकांनी कारवाईत हस्तक्षेप केला नाही. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, क्षेत्रीय अधिकरी रिजवान शेख, नितीन इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, याच परिसरात नदीच्या हरित पट्ट्यात बेकायदेशीररीत्या तीन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मनपा त्यावरही हातोडा टाकणार आहे.

हद्द निश्चितीनंतर हटणार अतिक्रमण •

महापालिकावतीने सीना नदीच्या हद्द निश्चितीचे काम सुरू आहे.

• काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. नदीच्या दोन्ही बाजूने हद्द निश्चित करून खांब रोवले जात आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी नदीपात्रालगत अतिक्रमण करून कच्चे व पक्के बांधकामे करण्यात आलेली आहे.

• हद्द निश्चितीचे काम पूर्ण झाल्यानंतर मनपाच्यावतीने पात्रात येणारी सर्व ‘अतिक्रमणे हटविली जाणार आहे.