नगर – शहरात सर्वेक्षणाचा गोंधळ सुरु; पहिली पास कर्मचाऱ्यांवर सोपविली सर्वेक्षणाची जबाबदारी

नगर – देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा समाज बांधवांना सध्या एकच अपेक्षा आहे. ती म्हणजे समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं. मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले. नगर शहरात महापालिकेने पहिली पास असलेल्या व कधीं शाळेत न गेलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक अश्या प्रगणक म्हणून नियुक्ती केली. काम सोपविण्यात आलेल्या बहुतांश जणांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नाही, अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणामुळे शासनाने २३ ते ३१ जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक, पर्यवेक्षकांना बुधवारी महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी तेथे येऊन चतुर्थ श्रेणीतील नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना या कामातून वगळण्याची मागणी केली. सर्वेक्षणासाठी मनपाने नगर शहरात विभागनिहाय सुमारे साडेनऊशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वेळेत काम करण्याच्या उद्देशाने या कामासाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत. मंगळवारी प्रगणकांनी काम सुरू केले तेव्हा मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड झाल्यानंतर लॉगीन झाले नाही. त्यामध्ये वारंवार एरर असे दाखवत होते. बुधवारीही बहुतांश प्रगणकांना याच समस्येचा सामना करावा लागला.

महापालिकेने चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली. यातील बऱ्याचश्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, काहींना इंग्रजी,मराठी लिहिता, वाचता येत नाही. अशा स्थितीत सर्वेक्षणाचे काम त्यांच्याकडून कसे पूर्ण होणार? या कामात काही अडथळे येऊ नयेत, म्हणून मनपाने ज्यांना सर्वेक्षणाचे काम करता येणार आहे त्यांचीच नियुक्ती करावी, इतरांना या कामातून वगळावे, अशी मागणी केली. परंतु मनपा स्वतःच्या चुका लपवून कर्मचाऱ्यांवर कारवाई करत असेल तर आम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभा आहोत. वेळ पडली तर आंदोलन करू.
अनंत लोखंडे
अध्यक्ष, मनपा कामगार संघटना

महापालिकेची कर्मचाऱ्यांवर दमबाजी
मनोज कांबळे नावाचा कामगार चतुर्थ श्रेणीत आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मी पहिली पास आहे. मला काम येत नाही. असे मीडियाला सांगितले यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनोजने कांबळे यांना बोलावून घेतले अतिरिक्त आयुक्त पठारे, श्रीनिवास कुरे, उपायुक्त निकत यांनी मनोज कांबळेंना मुलाखत का दिली म्हणून दमबाजी केली. तो कर्मचारी घाबरला महापालिका स्वतःच्या चुका लपवते कर्मचाऱ्यांवर कारवाई करते.

शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वेळेत काम पूर्ण करायचे आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली, शाळेतील महत्त्वाच्या कामामुळे शिक्षकाना येणे शक्य न झाल्याने मनपाच्या उर्वरित कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली. त्यामुळे अडचणी दिसून आल्या त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार जे कर्मचारी, अशिक्षित, अल्पशिक्षित तसेच अपंग आहे. त्यांच्या जागी आता दुसरे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मेहेर लहारे,
सहाय्यक आयुक्त, मनपा