सर्वांना बरोबर घेऊन परिसराचा विकास करणार – खासदार नीलेश लंके

शेवगाव – कामे सांगत रहा, कायम संपर्कात रहा. मी खासदार झालो असा अहम भाव मला वाटता कामा नये. लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली रहावी, हेच नाते जपू या. माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाहीतर अधिकार वाणीने कामे सांगा. कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्यागोंविदाने नांदायला हवा. अठरापगड समाजाला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापणाऱ्या छत्रपती शिवरायाचे आपण मावळे आहोत. सर्वांना बरोबर घेऊन सर्व मिळून परिसराचा विकास साधू, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी येथे केले.

खासदार नीलेश लंके शुक्रवारी आभार दौऱ्यानिमित्त शेवगावी आले असता येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलत होते. सायंकाळी पाचचा कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरू झाला. सर्वप्रथम त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून सभास्थानी आले. डीजेच्या निनादात फटाके, तोफांची आतषबाजी झाली.

खा. लंके म्हणाले, तुम्ही मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली, आता पुढील काळात मी तुमचा सेवक म्हणून काम करणार आहे .सत्ता ही मिरवण्यासाठी नसते, तर ती सर्वसामान्यांच्या कामासाठी असते. एका बलाढय अशा आसूरी ताकदीला गाडून माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण संसदेत पाठवले. आता जबाबदारी माझी आहे. सर्व घटक पक्षांनी मनापासून काम केले.सहाव्या फेरीपर्यंत मागे होतो. दुपारपर्यंत वेगळे स्टेटस् ठेवणारे सत्काराला पुढे येत आहेत. तेव्हा त्रास घेऊन काम करणारा आपला कार्यकर्ता नाराज होतो. फक्त आचारसंहिता संपू द्या. प्रशासनातील माणसे आपलीच आहेत. सर्व प्रलंबित कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली .

बंडू रासने यांनी पाण्याचा व विजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार यांनी विरोधकाचा चांगलाच समाचार घेत लेकाची जिरवली, आता बापाची जिरवायची आहे. जिल्ह्यात १२ चे १२ आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणायचे,असे काम करायचे. या कामासाठी खासदार लंके यांना आपण पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.

ॲड प्रताप ढाकणे म्हणाले, खा .लंके नशीब घेऊनच आले आहेत. लोकभावना व मन समजून घेणाऱ्या कार्यकर्त्यास लोक डोक्यावर घेतात. ज्याला शक्तीची घमेंड आहे, त्याची मस्ती समाज उतरविल्याशिवाय राहत नाही. धनशक्तिपेक्षा जनशक्ती मोठी असल्याचे शरद पवार साहेबांनी दाखवून दिले आहे . त्यांनी नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा मताधिक्याने विजयी करून जिल्ह्याचा श्वास मोकळा केला आहे.

यावेळी वजीर पठाण, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, अविनाश देशमुख यांचीही भाषणे झाली .राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदू मुंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे, शरद सोनवणे, माजी सरपंच राहूल मगरे, एजाज काझी, अप्पा मगर, एकनाथ कुसळकर, ॲड.शिवाजी लांडे पाटील, सुनिल काकडे,यांचेसह हजारो नागरिक उपस्थित होते. दीपक कुसककर यांनी सूत्रसंचलन केले. केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी आभार मानले .