कोलकात्यात आप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री

कोलकाता – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली. त्यावेळी आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली.

पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. मध्य कोलकाता येथील मुरलीधर सेन लेन येथील राज्य भाजप मुख्यालयाबाहेर ही घटना घडली.

आपचे कार्यकर्ते केंद्राच्या विरोधात घोषणा देत असतानाच पक्ष कार्यालयात असलेले भाजप कार्यकर्ते बाहेर आले आणि त्यांनी प्रत्युत्तरात घोषणा देण्यास सुरुवात केली. तणाव वाढल्याने दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली.

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तीस आप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.आप कार्यकर्त्यांनी जोरसांको पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि आरोप केला की त्यांच्या महिला सदस्यांचा भाजप कार्यकर्त्यांनी विनयभंग केला.

आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि लाठ्या मारल्या, असे आप समर्थकाने सांगितले. भाजपने आप समर्थकांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नव्हते तर तृणमुल कॉंग्रेसचेच कार्यकर्ते होते असा दावाही भाजपच्या नेत्यांनी केला आहे.