पुणे जिल्हा | अवकाळीमुळे वातावरणात बदल; शेतकऱ्यांचे झाले नुकसान

सोरतापवाडी, (वार्ताहर)- अवकाळी पावसाने पूर्व हवेलीत वातावरणात बदल झाला असून शेतकरी मात्र हवादिल झाला आहे. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी काचंन, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, वळती, तरडे, शिंदवणे, टिळेकरवाडी, भवरापूर, आदी गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व पिके नष्ट होतील या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. आठवड्यात तीन दिवस झालेल्या पावसाने पूर्व हवेलीत ढगाळ वातावरण दिसून येत आहे. बाजारात पाठवण्यासाठी भरलेल्या कांद्याच्या पिशव्या या उकाड्याने गरम होऊन कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आधीच बाजार भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ढगाळ वातावरणामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. पेठगावचे पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांचा काढणीस आलेला पालक भाजीपाला खराब झाला आहे. सोरतापवाडी येथील तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष अशोक चौधरी व इतर शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
पूर्व हवेलीतील काही गावात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे फुलांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. करप्या व भुरी रोगामुळे फुलांचे उत्पादन घटले असून चांगला बाजार भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कष्ट करून फुलशेती फुलवली आहे. पण पावसामुळे करप्या व भुरी रोग कमी होऊन फूल उत्पादन वाढेल व लग्न सराईमुळे फुलांना बाजारभाव चांगला मिळले या आशेवर फुल उत्पादक शेतकरी आहेत.