#MumbaiMetro3 : मुंबई मेट्रो-3 च्या पहिल्या भूमिगत ट्रेनची यशस्वी चाचणी; जाणून घ्या….काय आहेत वैशिष्टये?

मुंबई :-मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की , मुंबई मेट्रो 3 (#MumbaiMetro3) ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल.

मुंबई मेट्रो लाईन ३ ची (कुलाबा- बांद्रा-सीप्झ कॉरिडॉर) ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –

  • मुंबई मेट्रो लाईन -३ च्या ट्रेन ८ डब्यांच्या असतील. ७५% Motorisation मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.
  • एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.
  • ८५ किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.
  • स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.
  • ट्रेन प्रचालनासाठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदाची frequency ठेवणे शक्य होणार आहे.
  • प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.
  • स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.
  • ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.
  • डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
  • रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून ‘मुंबई मेट्रो लाइन -३’ या संपूर्ण भूमिगत मार्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.
  • सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.