गृहिणींना दिलासा ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली – सरलेल्या बारा महिन्यात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गेल्या काही आठवड्यात खाद्य तेलाच्या दरात काही प्रमाणात घट होत होती. त्यातच आता केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात मोठी घट केली आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्‍यता बळावली आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, खाद्य तेलावरील आयात शुल्क प्रति टनाला 112 डॉलरपर्यंत कमी करण्यात आले आहे. या सूचनेची अंमलबजावणी लगेच सुरू करण्यात आली आहे.

भारतातील खाद्य तेलाचे उत्पादन गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे भारताला बरेच खाद्यतेल आयात करावे लागते. मात्र आयात खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क असल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने आज घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे खाद्यतेलाच्या आयातदार संघटनेने म्हटले आहे.

एक वर्षांमध्ये खाद्य तेलाचे दर जवळजवळ दुपटीने वाढले आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. सरकार मध्यम, लघू आणि दीर्घ पल्ल्याच्या उपायोजना करून खाद्यतेलाचे दर आवाक्‍यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सरकारने गळीत धान्याचे उत्पादन वाढावे यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत.

आधारभूत किमतीच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असे सरकारला वाटते.