साताऱ्यात केश कर्तनालय व ब्युटी पार्लर सुरु करण्यास सशर्त परवानगी

सातारा  (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही अंशी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालाय व ब्यूटी पार्लर दुकानांमध्ये सेवा घेणाऱ्या ग्राहकाला मास्क लावता येत नसल्यामुळे करोना संसर्गाची शक्यता जास्त असते म्हणून याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत.

केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींची रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देऊन पुन्हा त्याचवेळी येण्याची विनंती करावी. या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. कारागीर व ज्या व्यक्तीचे केश कर्तन किंवा दाढी करावयाची आहे अशा दोन व्यक्तीच दुकानामध्ये असतील.

उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्यूटी पार्लरमध्ये दोन खुर्च्यांमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागिराला काम करता येईल. सेवा घेणारी व्यक्ती मास्क लावू शकत नसल्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये.

Leave a Comment