महेश कोठारे यांना मातृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे काल १५ जुलै २०२३  सायंकाळी वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे आणि नातू प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

अल्प परिचय –

जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज. माहेरच्या त्या तळपदे. १९ जून १९३० ही त्यांची जन्मतारीख. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व.प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर  जेनमा तसेच अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे ते विविध नाटके सादर करीत असत. कालांतराने  महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून ज्या गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केले. या काळात त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान जेनमा महेशसोबत असून त्यांना मार्गदर्शन करत असत.

दरम्यान, महेश कोठारे यांनी निर्मिती केलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये पडद्यामागे राहून त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ‘धुमधडाका’ चित्रपटापासून महेश कोठारे यांनी चित्रनिर्मितीला सुरुवात केली.    या चित्रपटाची निर्मिती महेश कोठारे यांनी ‘जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल’ या बॅनरद्वारे केली होती.

‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आदी यशस्वी चित्रपटांची निर्मिती या बॅनरतर्फे करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचेदेखील निधन झाले होते.